राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांनी केली महत्वाची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या २३ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असला तरी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक होणार असून,या बैठकीत महाविद्यालये केव्हा सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल,अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत आज महत्वाची घोषणा केली आहे.सध्या तरी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.याबाबत दिवाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक होणार असून, या बैठकीत महाविद्यालये केव्हा सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल असे सामंत यांनी सांगितले.राज्यातील महाविद्यालये आणि वसतीगृहे यांचा वापर क्वारंटाईन सेंटरसाठी करण्यात आला असल्याने कोरोना निवळताच अशा महाविद्यालयांचे आणि वसतीगृहांचे सॅनिटाइज करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचेही सामंत म्हणाले.

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.त्यासंदर्भात राज्यातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी पार पडलेल्या परीक्षांच्या निकालांची अंदाजे टक्केवारीची माहिती मंत्रालयात‍ झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.काही कुलगुरुंनी परीक्षेप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात कोरोनाच्या काळात झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत १५ टक्के इतके वाढलेले आहे. आज आम्ही जी गुणपत्रिका दिली, त्यावर कोविडचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.आम्ही हे करून दाखवले आहे.सध्या ही तात्पुरती गुणपत्रिका आहे,ती मुख्य गुणपत्रिका लवकरच दिली जाईल,पदवीच्या प्रमाणपत्रावरही कोणताच बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या काळात अनेकांनी विद्यापीठांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.याला विद्यापीठांनी चांगले उत्तर दिलेले आहे. परंतु सरकारने अतिशय चांगली कामगिरी केली,यामुळे राज्यात एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहीला नाही.मात्र याच परीक्षांच्या काळात मुंबई, पुण्यात जो प्रकार घडला त्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.ज्या कंपनींनी अडचणी उभ्या केल्या त्यांना आम्ही सोडणार नाही,अनेक ठिकाणची सायबरकडे तक्रार केली असून त्यासाठी येत्या आठ दिवसांत हे काय झाले त्याचे चित्र समोर येईल,असेही सामंत यांनी सांगितले.तर अभियांत्रिकी, फार्मासीचे प्रवेश हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होईपर्यंत आम्ही विचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.काही अपवाद वगळता १३ विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.यामध्ये २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने तर केवळ दोन विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली आहे.या परीक्षांचा निकाल अंदाजे ९३ टक्के लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७ ते ९० टक्क्यावर जावू शकते असेही सामंत यांनी सांगितले.आम्ही परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे परीक्षा सुरळीत घेतल्या आहेत.येत्या काळात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांची गरज लागणार नाही,असे तंत्रज्ञान आम्ही लवकरच विकसित करणार आहोत असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Previous articleवाचा : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleसरकारने पाठवलेल्या १२ नावांना राज्यपाल विरोध करणार नाहीत