मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगली व्यक्ती आहेत.ते विधान परिषद सदस्यांच्या नावाला विरोध करणार नाहीत,अशी उपहासात्मक टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.दरम्यान,काही दिवसांपूर्वीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषद सदस्यांच्या नावावरून भाजपवर गंभीर आरोप केला होता. मात्र राज्यपाल मंत्रिमंडळाने दिलेली सदस्यांची नावे फेटाळणार नाही,असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील सदस्यांच्या नावावरून सध्या तिन्ही पक्षात चुरस रंगल्याचे पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी देखील घडताना दिसत आहेत. राज्यपाल आणि महाविकास आघाडीमधील मतमतांतरे पाहता मंत्रिमंडळाने प्रस्तावित केली सदस्यांची नावे राज्यपाल स्वीकारणार का? यावर सध्या चर्चा रंगली आहे. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे हे सदस्यांच्या नावांना विरोध करतील, असे वाटत नाही. तर काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आली असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांचा पेच वाढण्याची चिन्हे आहेत. यावेळी छगन भुजबळ यांनी यंदाच्या नागपूर अधिवेशना संदर्भात देखील भाष्य केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन रद्द होणार, अशी चर्चा आहे. नागपूरच्या आमदार निवासात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशन घेऊ नये, अशी इच्छा तिथल्याच आमदारांनी व्यक्त केली आहे. परंतु अधिवेशन कुठे घ्यायचे याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येईल,असेही भुजबळ यांनी सांगितले.