राज्यपालांना अर्णबच्या आरोग्याची काळजी, थेट गृहमंत्र्यांना केला फोन

मुंबई नगरी टीम

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजप नेते हे राज्य सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आता राज्यपालांनी देखील उडी घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच गोस्वामी कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्ती करत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. यावेळी राज्यपालांनी अर्णब गोस्वामीच्या आरोग्यविषयी काळजी व्यक्त केली, अशी माहिती आहे. तसेच गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची व त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनी याधीही अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या पद्धतीवरून नाराजी व्यक्त केली होती.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले अर्णब गोस्वामी यांची रवानगी रविवारी तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. याआधी या तिघांनाही अलिबाग येथील नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याचे त्यांना तळोजा येथे हलवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते आक्रमक झाले असून अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे.

Previous articleम्हणून पवार कुटुंबांने रद्द केला बारामतीत होणारा दिवाळी सोहळा
Next articleपदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा