मुंबई नगरी टीम
मुंबई : गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपाल यांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर यामध्ये आता राज्यपालांनी देखील उडी घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच गोस्वामी कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.त्यानंतर मलिक यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
ज्या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्णव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात.नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.