मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून आज मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली असून,आपल्याला सदिच्छा देणा-या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. गेल्या महिन्यात राज्यातील एका पाठोपाठ एक बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाली होती.यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता.त्यानंतर काही दिवसांनी दिलीप वळसे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
“आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रार्थना व माझ्यावर उपचार करणारे कोरोनायोद्ध्ये डॉक्टर,नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे’, असे ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. २९ ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयातही हजर होते. यादरम्यान त्यांना आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच ते मंत्रालयातून परत माघारी फिरले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीप वळसे पाटील यांना कसलाही त्रास जाणवत नव्हता.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज १० नोव्हेंबरला त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार सुनील यांनाही डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या कामकाजाला देखील सुरुवात केली आहे. तर आता दिलीप वळसे पाटीलही लवकरच पूर्वीसारखे जोमाने काम करताना दिसतील.