मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यात सध्या वाढीव वीज बिलांवरून जोरदार राजकारण सुरू असून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. वीज बिलांवरून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टिकेनंतर काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे काड्या लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
वाढीव वीज बिलांच्या वक्तव्यावरून घुमजाव केल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज बिलांसंदर्भात आकडेवारी सादर करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बावनकुळेंच्या या आकडेवारीचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. लॉकडाउन काळात आलेल्या वीज बिल तक्रारी उर्जामंत्र्यांनी सोडवल्या आहेत. नितीन राऊत यांच्याबद्दल बोलण्याचा बावनकुळेंचा सबंध काय? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केले. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकतात. लवकरच एकत्र बैठक घेऊ,असे सूचक विधान त्यांनी केले. दरम्यान, वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून भाजप आणि इतर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. तर मनसेच्या या आंदोलनात भाजपही त्यांच्यासोबत असेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.