मुंबई महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ‘मिशन मुंबई’साठी जोरदार तयारी करत आहे. परंतु मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता आणण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.

मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून आमचा त्यांना पाठिंबा आहे. मुंबई महापालिकेत आपली सत्ता यावी हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाटणे साहजिक आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस इतर मित्रपक्ष एकत्र येणार असून फडणवीसांचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. एकीकडे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे मुंबई महापालिकेत तिन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

२०२२ ला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा खाली उतरवून आपला भगवा फडकवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. मात्र साथ कोणाला द्यायची हे मुंबईकरांना कळते, असा टोला शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी लगावला आहे. “मुंबई ही शिवसेनेवर प्रेम करणारी आहे. गेली २५ वर्षे मुंबईने शिवसेनेवर हे प्रेम केले आहे. खुप जण आले खूप घोषणा केल्या. परंतु मुंबईने कधी शिवसेनेची साथ सोडलेली नाही. कारण मुंबईमध्ये प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगात शिवसेनाच उभी राहिली आहे”, असेही अनिल परब यांनी सांगितले.

Previous articleचंद्रशेखर बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करतायत, महसूल मंत्र्यांचा हल्लाबोल
Next articleमुंबई मनपा निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का ?, भाजप नेत्यांनी केला हा खुलासा