मुंबई मनपा निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का ?, भाजप नेत्यांनी केला हा खुलासा

मुंबई नगरी टीम

पुणे : भाजपने एकीकडे मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि मनसेने यांचे मनपा निवडणुकीत समीकरण जुळण्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. कारण मनपा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपचा कोणताही नेता थेट नकार देताना दिसत नाही आहे. त्यामुळे रंगलेल्या या चर्चांबाबत विचारले असता भाजप नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात भाष्य केले. मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे.तर बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. मनसेसोबत जाण्याचा पक्ष विचार करेल,असे दरेकर यांनी स्पष्ट केले. तर भाजपला मनसेची साथ मिळाली तर स्वागत कराल का? असा प्रश्न विचारला असता, झेंडाही आमचाच आणि काठीही आमचीच असेल, असे विधान अतुल भातखळकर यांनी केले आहे. महापालिकेवर भगवा भाजपचाच फडकेल यात काही शंका नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट आल्यानंतर भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होती. त्यातच मनसेने आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. त्यामुळे मनसेने हिंदुत्वाच्या दिशेने आपला राजकीय प्रवास सुरू केला असल्याचे बोलले जात होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी त्यांच्या युतीचे संकेत देणारे होते. मात्र भाजप आणि मनसेकडून कधीही या चर्चांना दुजोरा देण्यात आला नाही. तर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली असून दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमुंबई महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार
Next articleएकनाथ खडसेंना कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईला रवाना