मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यभरातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
मदान यांनी सांगितले की, राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी ३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.