…अन्यथा सोमवारी राज्यभर तीव्र आंदोलन करणार, मनसेचा सरकारला अल्टिमेटम

मुंबई नगरी टीम

मुंबई : वाढीव वीज बिल सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. कोरोना काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्यास सरकारने नकार दर्शवल्याने समान्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. नागरिकांची ही भावना लक्षात घेता मनसेने आता वाढीव वीज बिलासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. यावेळी वीज बिल वाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा बाळा नांदगावकर यांनी आज केली. सरकारने वीज बिले कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वीज बिल माफी झाली नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही निवेदन दिले होते. मात्र वीज बिल माफ झाली नाही. महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे, ही राज्यातील जनतेची फसवून असल्याची टीका बाळा नांदगावकर यांनी केली.

सरकारने श्रेय वादाची लढाई न करता लोकांची वीज बिल माफ करून टाकावीत. सोमवारपर्यंत यावर निर्णय न झाल्यास प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेकडून मोर्चे काढण्यात येतील. तसेच राज्यभरात मनसेने स्टाईलने आंदोलने केली जातील. यावेळी जर उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही बाळा नांदगावकर यांनी केले आहे.वाढीव वीज बिलांसंदर्भात राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे शरद पवारांशी फोनवरून बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदने मागवली व आम्ही ती दिली. मात्र अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्हाला शरद पवारांवर विश्वास आहे. पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेही नाही, असा खोचक टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.

Previous article‘नॉटी’ पुरुषांचे विचार महाराष्ट्रातून स्वच्छ करण्यास मदत करा,मिसेस फडणवीसांचा राऊतांना चिमटा
Next articleग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार;यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द