ईडीची रेड पडली म्हणून माझं तोंड बंद होणार नाही ; प्रताप सरनाईक आक्रमक

मुंबई नगरी टीम

मुंबई : “या देशामध्ये, राज्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी जो करत असेल, मुंबई पोलिसांची बदनामी जो करत असेल. महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत असेल, अशा गोष्टींवर मी बोलणार, ईडीची रेड पडली म्हणून माझे तोंड बंद होणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. मला फाशी दिली तरी मी स्विकारायला तयार आहे, असे त्यांनी म्हटले. मंगळवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरात आणि कार्यालयावर छापेमारी करत कारवाई केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या कारवाईवरून भाजपवर टीकास्त्र डागले होते.

प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झालेल्या कारवाई संदर्भात भाष्य केले. “ईडीच्या लोकांनी माझ्या कार्यालयावर, घरी सगळीकडे त्यांनी चौकशी केली कागदपत्रे ताब्यात घेतली. मी गेल्या तीस ते बत्तीस वर्षांपासून कंस्ट्रक्शन आणि हॅाटेल व्यवसायामध्ये आहे. त्याची कागदपत्रे आहेत, मी रितसर त्याचा आयकर भरतो. सगळी माहीती माझ्या स्टाफने, माझ्या मुलाने ईडीला दिलेली आहे. त्यातही त्यांचे जर समाधान झाले नाही, तर ईडीने बोलावल्यावर मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास समर्थ आहे, त्यांना सहकार्य करेन”,अशी भूमिका त्यांनी मांडली.

“ज्या दिवशी अर्णब गोस्वीवर आणि कंगना राणावतवर हक्कभंग दाखल केला. ज्या दिवशी अन्वय नाईक आत्महत्या प्रकाणाची केस पुन्हा उघडायला लावली. त्याच दिवशी उद्या काय होणार आहे, याचा प्रताप सरनाईनने विचार केला होता. या संकटांना सामोरे जात संघर्ष करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची भूमिका ही प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट करणे ही प्रवक्ता म्हणून मला दिलेल्या जबाबदारीचे मी पालन करत आहे. या देशामध्ये, राज्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी जो करत असेल, मुंबई पोलिसांची बदनामी जो करत असेल. या महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत असेल, अशा गोष्टींवर मी बोलणार ईडीची रेड पडली म्हणून माझे तोंड बंद होणार नाही. काय फाशी द्यायची आहे? ती दिली तरी मी स्विकारायला तयार आहे. मला माहीतीय मी अशी कोणत्या आर्थिक गोष्टीत अडकलेलो नाही, पुढेही अडकणार नाही. जो माणूस अशा गोष्टींत अडकलेला नसतो तोच ठामपणे विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो”, असेही त्यांनी म्हटले.

“जाणीवपूर्वक ऑपरेशन लोटसच्या नावाखाली शिवसेनेच्या आमदारांना त्रास देणे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांना, मंत्र्यांना त्रास देणे ही जर भाजपची भूमिका असेल तर ती त्यांनी बदलणे गरजेचे आहे. आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता येईल. त्यावेळीस तुम्ही कुठे असाल”, असा सूचक इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. दरम्यान, सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही सूडबुद्धीची असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले होते. त्यामुळे या कारवाईनिमित्त भाजप आणि शिवसेनेत पुन्हा खडाजंगी होणार यात काही शंका नाही.

Previous articleसध्या तरी महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Next articleभाजपच्या १२० नेत्यांची यादी देणार,बघुयात ईडी कोणाला बोलावते : संजय राऊत