जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर शरद पवार निर्णय घेणार…आता आव्हाडांच्या भूमिकेकडे लक्ष !

मुंबई नगरी टीम

मुंबई । हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.काल ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांना धक्का दिल्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले.यामुळे विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत या प्रकरणी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.आव्हाड यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अंतिम निर्णय घेतील आणि साहेबांचा शब्द म्हणून आव्हाड यांना तो मान्य करावा लागेल अशी रोखठोक भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.

हर हर महादेव चित्रपटाला विरोध करीत प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेले आणि नंतर जामीन मिळालेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.ठाण्यातील एका पुलाच्या उद्घाटनावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांना धक्का दिल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने ते चांगलेच आक्रमक झाले.या घटनेच्या निषेधार्थ आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली.आक्रमक झालेल्या आव्हाडांची मनधरणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट ठाणे गाठून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.संबंधित महिलेने रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तितका कमीच आहे.पोलिसांचा गैरवापर सुरू आहे आणि पोलीसदेखील एखादया प्याद्याप्रमाणे काम करत असतील तर महाराष्ट्रातील जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही असे सांगून पाटील यांनी पोलिसांनी घेतलेल्या कृतीचा निषेध केला.यावेळी पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे ही गंभीर बाब आहे.त्यामुळेच जितेंद्र आव्हाड हे फार व्यतीत झाले आहेत. आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देणार असल्याचे कळवला आहे. त्यामुळे येथे येऊन त्यांची समजूत घालण्यासाठी आलो असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.प्रवासात असताना त्यांच्याबाबतीत असलेली चित्रफीत पाहिली.याशिवाय काही माहिती लोकांनी दिली. एका कार्यक्रमात त्या महिलेला भगिनी म्हणून जितेंद्र आव्हाड संबोधतात,त्यावरून आव्हाड यांची भावना कळेल आणि या व्हिडीओमध्ये तीच महिला आहे.त्याच भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी स्थानिक खासदार हे आधी आव्हाड यांच्यासमोर येतात त्यांना पाठीमागे जाण्यासाठी जागा करून देतात. त्याचवेळी त्या महिलेला ‘गर्दीत कशाला आहात बाजूला थांबा’ असे हात लावून सांगतात. त्या व्हिडीओत त्यापेक्षा वेगळी कृती नाही तरीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचेच आश्चर्य वाटते असेही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा सदस्यांच्याबाबत झालेल्या घटनेची दखल घेतली आहे की नाही हे दिसत नाही.परंतु मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा प्रकार होता मुख्यमंत्र्यांनी त्याच ठिकाणी किंवा असे घडल्यानंतर त्याबाबत हस्तक्षेप करायला हवा होता असेही पाटील म्हणाले.३५४ च्या घटना बसवून जाणीवपूर्वक एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असू तर हा कायद्याचा चुकीचा वापर आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ या सिनेमाच्या विरोधात भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात झाला तर महाराष्ट्रातील जनता हे कधी सहन करणार नाही ही ठाम भूमिका मांडली त्याला पक्षाचे समर्थन आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.चित्रफीत बघितली तर यामध्ये कोणत्या प्रकारचा विनयभंग बसतो हे महाराष्ट्राच्या पोलिसांनी आम्हाला सांगावे. याबाबतीत सरकारलाही जाब विचारु आणि पोलीस यापध्दतीने वागत असतील तर पोलिसांनाही या सर्व गोष्टींची उत्तरे द्यावी लागतील असा इशाराही पाटील यांनी दिला.आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे.याबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो आहे. आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे. त्यांची बराच वेळ समजूत घालावी लागली. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे.शरद पवार यांच्याशी चर्चा करुन यावर निर्णय घेऊ अशी विनंती केली आहे. परंतु या सगळ्या प्रकारातून ते व्यतीत झाले आहेत. इतर कोणताही आरोप सहन करेन परंतु ३५४ सारखा गुन्हा सहन करणार नाही असे ते सांगत आहेत. सार्वजनिक जीवनात किती खालच्या स्तरावर राजकारणाचा स्तर गेला आहे किती हीन पातळीवर व्यक्तीगत एखाद्याची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न होतो यामुळेच आव्हाड व्यतीत झाले आहेत. म्हणूनच त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे असेही पाटील यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार
अजित पवार
लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे ‘चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे’ असतात हीपण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी दिला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे असेही पवार यावेळी म्हणाले. सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पहाता जर कुणी कायदा हाती घेतला,चूक केली,नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कुणीतरी कारण नसताना नवीन जे कायदे – नियम केले आहेत त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असेल तर याकडे जनतेने जागरुकतेने पहावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.आव्हाड यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निर्णय घेतील, त्यांना पटो किंवा नको,साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी मांडली असल्याने आता आव्हाड काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

माझ्या खुनाचे नियोजन झाले असते तर काही वाटलं नसतं

माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला असता तरी चालले असते परंतु ३५४ हा गुन्हा मला मान्य नाही. आणि जो मी आयुष्यात केला नाही.पोलिसांनी हा गुन्हा कसा काय दाखल केला.तक्रारीत शब्द वापरले आहेत ते त्यापेक्षा व्हिडीओ स्पष्ट आहे.समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग झाला आहे त्यामुळे राजकारण करावं, मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत सगळ्यांना माहित होती.सरकार सगळ्यांचे असते आमदारांमध्ये भेदभाव केला नाही. मला असेच पोलीस ठाण्यात नोटीस देत आहे म्हणून बोलावले. थोड्यावेळाने डीसीपी आले त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मी मुंबईत जातोय म्हटल्यावर तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. ४१ अन्वये नोटीस दिल्यानंतर ७२ तास त्या व्यक्तीला द्यावे लागतात. त्या नोटीसमध्ये पाच वाजता चौकशीला हजर रहा सांगत आहेत. इंग्रजाच्या काळातील कलम लावून उपजीविकेच्या साधनात अडचण केली म्हणून मला अटक करण्यात आली.

आम्ही लढलो शिवाजी महाराजांसाठी आणि लढत राहू त्यामुळे तुरूंगामध्ये राहणे हे नवीन नाही. जेम्स लेन आला तिथपासून लढत आहे. आणि ही लढाई अविरत चालू राहील. पण पोलिसी बळाचा वापर कशासाठी त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. परंतु माझ्यावर ३५४ गुन्हा दाखल करता. माझ्या खुनाबद्दल प्लॅनिंग झाले असते तर काही वाटलं नसते परंतु ३५४ चा गुन्हा दाखल करता इतके खालचे राजकारण त्यापेक्षा यात न राहिलेले चांगले असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाडांच्या कृत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि रूपाली चाकणकर गप्प का ?
रिदा रशीद यांचा सवाल

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका पुलाच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या गप्प का,त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी केला.

रिदा रशीद म्हणाल्या की, ठाण्यात रविवारी झालेल्या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते.या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते.मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ-सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले.ढकलून देत असताना, ‘तू इथे काय करते आहेस, असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. या घटनेची ध्वनिचित्रफित सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले हे स्पष्टपणे दिसते आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या या कृत्याबाबत अजूनही चकार शब्द उच्चारलेला नाही.माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही रशीद यांनी नमूद केले.

जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा
चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा दिलेला इशारा यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी हाताने धरून एका महिलेला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी आजच आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी नुकताच एका नेत्याने अपशब्द उच्चारला.भारतीय जनता पार्टी त्याचे कधीही समर्थन करणार नाही. पण त्यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओत दिसत असूनही समर्थन करतात. हा त्या पक्षाचा दुटप्पीपणा आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य जितके चूक आहे तितकेच त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करणेही चूक आहे. शहरात असे होत राहते, असे ज्यांनी म्हटले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. ते गृहमंत्री असताना राज्यात दादागिरी चालू देणार नाही. भाजपा हे सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Previous articleआपल्या लोकशाही आणि घटनेसाठी …आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत चालले
Next articleसरकारमधील वाचाळवीरांना आवरा,महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावू देऊ नका !