सरकारमधील वाचाळवीरांना आवरा,महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावू देऊ नका !

मुंबई नगरी टीम

मुंबई । विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारमध्ये वाचाळवीरांचे मोठे प्रस्थ वाढले आहे.काही मंत्री कसलीही विधाने करीत असल्याने मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे.त्यानंतर काहीजण सहज बोललो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात.मात्र ते बोलायला नागरीक नाही तर राज्याचे मंत्री आहेत.त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.त्यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांच्याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांची केलेले वक्तव्य हे विनाशकाले विपरीत बुद्धी असेच आहे.आपण काय बोलतोय हे त्यांना समजायला हवे,मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का असा सवाल करीत मंत्री पदे येतात आणि जातात, कोण आजी,कोण माजी असतात.मात्र आपण नागरीक आहोत संविधान,कायदा,नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये ते चुकत आहेत असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी अजित पवार यांनी बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला खडेबोल सुनावले.अंबरनाथमध्ये बैलगाडी शर्यतीवरून दोन गटात गोळीबाराची घटना घडली असे सांगून सरकार काय करतेय असा प्रश्न उपस्थित केला.ठाण्यात किसननगर भागात शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला अशी राडेबाजी करुन चालणार नाही असे सांगून पोलिसांना बाकीच्यापेक्षा या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटातील आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का ? असा सवाल पवार यांनी केला, काहींना तर ३० – ३० सरकारी गाड्यांचा देण्यात आला आहे. मी उपमुख्यमंत्री असताना जास्त गाड्या असल्या की त्या नको सांगत होतो.हा पैसा तुमचा नाही. सरकारकडे तो कर रूपाने आलेला आहे.ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.परंतु सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काय आवश्यकता आहे संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.माझा परदेश दौरा यापूर्वीच ठरला होता.तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील शिबीराला एक दिवस उपस्थित राहून दौ-यावर गेलो मात्र एवढया दिवसात पत्रकार परिषदांनात दिसलो नाही तर लगेच अजित पवार कुठे गेले ? अजित पवार उपलब्ध नाहीत.अजित पवार नाराज,अशा काही बातम्या आल्या जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते.मात्र चार -पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी मी इथे नव्हतोच. त्यामुळे प्रतिक्रिया देता आल्या नाही असा खुलासा रोज येणाऱ्या बातम्यावर पवार यांनी केला.

यापूर्वी महत्वाच्या बैठका रद्द होत नव्हत्या अधिका-यांना ताटकळत बसावे लागत नव्हते परंतु आता तसे होताना दिसत नाही. पोलीसांचे चांगले प्रशासन म्हणून जगभर ओळख आहे परंतु या सरकारच्या काळात राज्यात पोलीस तणावाखाली काम करत आहे असेही पवार यांनी सांगितले.ठाण्यात जो प्रकार झाला त्यामध्ये पोलिसांना वरीष्ठ पातळीवरून फोन येत असल्याचे पोलीस बोलून दाखवत होते. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश येतात असेही ते म्हणाले.राज्यात चाललेली जी परिस्थिती आहे ती अशीच जर राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रात असणाऱ्या सर्वच पक्षाच्या वरिष्ठांनी कारखानदारी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.यांच्या काळात बाहेरचे मुख्यमंत्री,बाहेरून आलेले वरीष्ठ लोकं, इथे बसून महाराष्ट्र सोडून या राज्यात जा त्या राज्यात जा अशापध्दतीने सांगत आहेत. हे राज्याला भूषणावह आहे का ? मोठे प्रकल्प गेले ना ? उदय सामंत यांचे वक्तव्य ऐकले की ३० दिवसात श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का गेले हे सांगणार आहेत.जरुर सांगा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही आमच्या चुका असतील तर त्या समोर आल्या पाहिजेत तुमच्या पाच महिन्याच्या नाकर्तेपणामुळे ते प्रकल्प आपल्याकडे राहण्याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतले नसतील आणि म्हणून महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले असतील तर तेही सांगावे असेही पवार म्हणाले.

वाचाळवीरांना आवरा,त्यांना ताबडतोब सूचना द्या,महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका.महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.हर हर महादेव चित्रपटाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.’हर हर महादेव’ हा चित्रपट तज्ज्ञ लोकांना घेऊन बघेन आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleजितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर शरद पवार निर्णय घेणार…आता आव्हाडांच्या भूमिकेकडे लक्ष !
Next articleसत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अस्वस्थ,राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता