मुंबई नगरी टीम
पंढरपूर : कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येत असताना पुन्हा लॅाकडाऊन होणार अशी चर्चा रंगली आहे.राज्यातील मंत्रीही लॅाकडाऊनबाबत आपापले मत व्यक्त करत असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. गोरगरिबांचे हाल करणा-या लॅाकडाऊनचे नावही नको,असे म्हणत अजित पवारांनी याला विरोध दर्शवला आहे. तसेच सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंढरपूरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
लॅाकडाऊनमुळे गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केल्यानंतर त्यांचे घर चालते. त्यामुळे अशांना लॅाकडाऊनचा फटका बसतो. मात्र तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळेस लॅाकडाऊन घोषित केले तेव्हा या सर्वांनी आदेशाचे पालन केले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेऊयात असे सांगत त्यांनी पुन्हा लॅाकडाऊनसाठी असहमती दर्शवली आहे. दरम्यान, राज्यात संपूर्ण लॅाकडाऊन होण्याची शक्यता नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. मात्र लोकांनी ऐकले नाही, तर टप्प्याटप्प्याने कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
कार्तिकी एकादशीनिमित्त अजित पवार यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार ? म्हणजे मुख्यमंत्रिपदी कधी विराजमान होणार, असा अप्रत्यक्ष प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर उत्तर देत जे काही पांडूरंगाच्या आशिर्वादाने मिळते, त्यात समाधान मानायचे आणि पुढे जायचे असते,असे त्यांनी म्हटले. यावेळी अजित पवारांनी विठूरायाच्या चरणी वंदन करत कोरोनावर मात करण्यासाठी लस लवकर येऊ दे आणि अवघे जर कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे घातले आहे.