मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारला नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केले आहे. म्हणून विरोधक निराश आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामकाजाचा समाचार घेतला. ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली, पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे सरकार कामात शून्य आहे, अशी जळजळीत टीका राणेंनी केली.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी राज्य सरकराने काम केले असल्याचे म्हणत नारायण राणेंना फटकारले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली.कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करूनच ते कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षण टिकावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा विषय न्यायालयात आहे. कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आहे. पाच वर्ष विरोध करण्याशिवाय त्यांना काम नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पुढील चार वर्षही अशीच समन्वयाने काढली जातील, असा ठाम विश्वास सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या वर्षपूर्तीनिमित्त सरकारने आतापर्यंत काय काय कामे केली याचा पाढा विरोधकांकडून वाचला जात आहे. सुरुवातीला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार कामात शून्य असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसाठी वापरलेल्या भाषेवरूनही राणेंनी त्यांचा समाचार घेतला.