तेव्हा फडणवीसांनी ‘हे’ प्रश्न मार्गी का लावले नाहीत? आ. शशिकांत शिंदेचा सवाल

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर विरोधक ठाकरे सरकारवर आगपाखड करत आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. यावर आता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी उत्तर देत उदयनराजेंवर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाही?, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची हमी मी देतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. त्यावर शशिकांत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उदयनराजेंवर टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या काळात मराठा आणि धनगर समाजाचे मोर्चे निघाले होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देखील फडणवीस सरकारने दिले होते. मग हे प्रश्न त्यांनी मार्गी का लावले नाहीत, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमलेले वकिलच आताची केस लढवत आहेत. तरी देखील भाजप जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आरक्षण देणे हे शरद पवारांच्या हातात नाही. तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून न्यायालयात विनंती केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा पर्याय शशिकांत शिंदे यांनी भाजपला सुचवला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार यांनी भूमिका घ्यावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. त्यावरून शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना केंद्राचा पर्याय सुचवला आहे. तसेच उदयनराजेंना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याचे काय झाले?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित
केला.

Previous articleआमच्या कामाला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही : शिवसेनेचा पलटवार
Next articleराज्यातील कोणतेही उद्योग राज्या बाहेर जाणार नाहीत : मुख्यमंत्र्यांचा विश्वास