पंकजा मुंडेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह….काय म्हणाल्या पंकजाताई !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. पंकजा यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली असून आपल्याला सदिच्छा देणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, पंकजा यांची तब्येत बिघडल्याचे समजताच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकारण बाजूला ठेवत आपल्या बहिणीला लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या होत्या.

“माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन, मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन”, अशी माहिती पंकजा यांनी ट्विटरवरून दिली आहे.पंकजा या पदवीधर-शिक्षक मतदारसांघाच्या निवडणूक प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. यादरम्यान त्यांना सर्दी, खोकला, ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या होत्या. खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. कोरोना काळात पंकजा यांची प्रकृती बिघडल्याने कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती.

यावेळी धनंजय मुंडे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजा यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली होती. “पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”, अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी घातली होती. राजकारणात नेहमीच एकमेकांच्या विरोधात असणारे मुंडे बहीण-भाऊ नेहमीच चर्चेत असतात. पण राजकारणापलीकडे जाऊन भाऊ बहिणीचे हे नाते न तुटणारे आहे, हे पुन्हा एकदा सर्वांनी पाहिले.

Previous articleसंजय राऊतांवर पुन्हा अँजिओप्लास्टी, लीलावती रुग्णालयात दाखल
Next articleमराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच प्रामाणिक भावना : अशोक चव्हाण