संजय राऊतांवर पुन्हा अँजिओप्लास्टी, लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या गुरुवारी दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी आज ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी झाली होती. मात्र त्रास वाढू लागल्याने त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ.अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल. त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे.

दरम्यान,संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मुंबई दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणे सोपे नाही. तसेच दक्षिण भारत, पश्चिम बंगाल व पंजाबमध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी तिथे जाऊन दिग्दर्शक आणि कलाकारांशी चर्चा करणार का?,असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मुद्यावरून भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राज्यातील भाजपा नेते अजानवरून राजकारण करत आहेत. कोरोनामध्ये धार्मिकस्थळांवर गर्दी होऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितले आहे.शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे जे म्हणत आहेत, त्यांनी हा तमाशा बंद करावा असे सांगतानाच, बेरोजगारी,जीडीपी आदी मुद्यांवर त्यांनी बोलायला पाहिजे असेही राऊत म्हणाले.

Previous articleतलाठी भरतीचा मार्ग मोकळा; इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार
Next articleपंकजा मुंडेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह….काय म्हणाल्या पंकजाताई !