मुंबई नगरी टीम
पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. पंरतु काही झाले तरी कायदा रद्द होणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कायद्यात बदल केला जाईल, मात्र तो रद्द होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना केंद्राने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत कायदा रद्द होणार नाही असे ठणकावून सांगितले.
पुण्यात एका आयोजित कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील बोलत होते. प्रश्न केवळ एमएसपीचा होता. याआधी एमएसपी गृहीत धरली जात होती. मात्र आता केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केवळ कायद्यात बदल केला जाईल, मात्र तो रद्द होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासह कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार असून चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाहीत कोणीही भेट घेऊ शकतात. भेट घेणाऱ्यांचे स्वागत असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
दरम्यान, शरद पवार हे आता केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मैदानात उतरणार आहेत. येत्या ९ डिसेंबरला ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासह अन्य राजकीय पक्षांचे काही नेतेही उपस्थित असणार आहेत. शेतकरी आंदोलनावर केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आंदोलन तीव्र होण्याआधी वेळीच यावर तोडगा काढण्याचा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे