मुंबई नगरी टीम
मुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद हे देशभरात उमटताना दिसत आहेत. यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्याच्या भारत बंदला राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शिवसेनेचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना दुहेरी भूमिका घेत असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तर काही राजकीय पक्षांना विस्मरणाचा आजार झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही एक प्रकारे टोला हाणाला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “या आंदोलनाला काही राजकीय पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा याबद्दल आश्चर्य वाटत आहे. जे पक्ष देशाच्या निवडणुकीत सातत्याने पराभूत होत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपले राजकारण करायचे आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या भविष्याची चिंता आहे. शेतकऱ्यांचे भविष्य त्यांच्यासाठी गौण आहे,” असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
या राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची ४७ वर्षे दोन महिने एक दिवस सत्ता होती. शिवसेनेसोबतची एक वर्ष म्हणजेच एकूण ४८ वर्ष दोन महिने एक दिवस त्यांची सत्ता होती. देशामध्ये ५२ वर्षांहून अधिक कालावधीमध्ये त्यांची सत्ता होती. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असे काय झाले? का व्याख्या बदलली याचे कधी चिंतन केले का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या पात्राविषयी विचारण्यात आले. तसेच भाजपकडून हे पत्र व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर ते म्हणाले, शरद पवारांचे पत्र भाजपने व्हायरल केलेले नाही. भाजपने व्हायरल केले तरी त्यात वाईट काय? ते पत्र खोटे आहे का?, त्यावरील लेटर हेड बनावट आहे का?, सही खोटी आहे? नेमके म्हणायचे काय तुम्हाला, असे सवाल करत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला घेरले.