मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : युपीए सरकारच्या काळात शरद पवार यांनी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळताना कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही राज्यांना पत्रे लिहली होती.सध्याच्या शेतकरी आंदोलनाला याच पत्राचा संदर्भ देत भाजप नेते पवारांवर निशाणा साधत आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीकास्त्र डागले होते. अखेर शरद पवार यांनी स्वतःच यावर भाष्य करत भूमिका मांडली आहे. मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार यांनी आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली.या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या पत्राचा ज्यांनी हवाला दिला आहे, त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांबाबत ते पत्र लिहले होते यामध्ये कोणतेही दुमत नाही. पंरतु आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत, त्यात याचा उल्लेख दिसत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच विषय भरकटवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप करत याला अधिक महत्त्व देऊ नका, असे त्यांनी म्हटले.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी अधिक बोलणे टाळले. पत्रकार शेतकरी आंदोलन आणि त्यांच्या पत्राविषयी वारंवार विचारत असलेल्या प्रश्नांमुळे शरद पवार काहीसे चिडलेले दिसले. दरम्यान, शेतकऱ्यांनी आज केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारत भारत बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीने देखील याला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे कृषी कायदे रद्द होणार नाहीत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.