मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शेती हा विषय शिवसेनेचा नाही, असे म्हणत निशाणा साधला आहे. केवळ पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची जाण नसतानाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. निलेश राणे यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यात भारत बंद आंदोलनाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. शेती हा शिवसेनेचा विषय कधीही असू शकत नाही. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. यावेळी निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राविषयी भाष्य करत टोला लगावला. कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी २०१० साली शरद पवार यांनीच केली होती. त्यामुळे आता कृषी कायद्यांना त्यांनी केलेला विरोध हा अनाकलनीय आहे, अशी जहरी टीका राणेंनी केली आहे. केवळ नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून विरोध केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शरद पवार यांचे १० वर्षांपूर्वीचे व्हायरल पत्र हे सध्याच्या शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. यावर स्वतः शरद पवार यांनी भूमिका मांडत टीकाकारांवर पलटवार केला आहे. ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांबाबत ते पत्र लिहले होते. पंरतु आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत, त्यात याचा उल्लेख दिसत नाही. विषय भरकटवण्यासाठी असे केले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.