होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे पवारांनी दाखवून दिले, मुंडेंचा विरोधकांना खोचक टोला

मुंबई नगरी टीम

शिरुर : देशातील मोदी सरकारला एखाद्या २५ वर्षांच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती आहे, तीच भीती या क्षणाला ८० वर्षांच्या शरद पवारांची आहे, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे आपण ऐकतो, मात्र शरद पवारांनी ते सत्यात उतरवून दाखवले, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील भाजप नेत्यांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोफत श्रवण यंत्र वाटपाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरूनही भाजपला सुनावले.

आजच्या लोकशाहीमध्ये ५६ आमदारांचा मुख्यमंत्री होतो,५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो,आणि १०५ आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. अशा या लोकशाहीचे दर्शन शरद पवारांनी उभ्या देशाला घडवले आहे. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते ही म्हण आपण ऐकत होतो. परंतु विधानसभा निवडणुकीत होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते पवारांनी सत्यात उतरवून दाखवले, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. अधिक बोलताना ते म्हणाले की, दिल्लीत सुद्धा श्रवणयंत्र देण्याची गरज आहे. सत्ता देणाऱ्या जनतेचे म्हणणे ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल, तेव्हा श्रवणाखाली देण्याची तरतूद असली पाहिजे. जिथे मशीन काम करू शकत नाही, तिथे हाताने काम करता आले पाहिजे.

यावेळी शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली. केंद्राच्या शेती धोरणाविरोधात शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहे. त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंपाक घरात सुद्धा शिजणारे अन्न हे शेतकऱ्याने मेहनतीने पिकवले आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाला तरी जागा. शेती करणारा नसेल तरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या. शेतकरी जगला तर आपण जगू, असे मुंडे म्हणाले.

Previous articleमोठी बातमी : राज्यात ६ हजार शिक्षकांची पदे भरणार
Next articleराज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण ;लसीकरणासंबंधीत राजेश टोपेंचे मोठे विधान