मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधी अशा जवळपास २५०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यापैकी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिसांचा आणि काही विधानभवन कर्मचारी यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील पावसाळी अधिवेशनात देखील ५२ जणांना कोरोनाची लागण झाली होती.मात्र यंदाच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आजपासून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवस असून ते मुंबईत होत आहे. खबरदारी म्हणून अधिवेशनापूर्वी अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये १७ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्यात आले होते. यावेळी ६ आमदारांसह ४६ अधिकारी,कर्मचारी आणि पोलीस कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ माजली होती. त्यानुसार यंदाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीही अशीच खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळी अधिवेशनापेक्षा यावेळी कोरोना बाधितांचा आकडा कमी दिसत आहे.
दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला विरोधकांनी आक्षेप घेतला घेत सरकारच्या चहापानावर देखील बहिष्कार घातला होता.तसेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेते महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला. कोरोनाच्या लढाईत सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. तर पत्रकार आणि विरोधकांवर अघोषित आणीबाणी या सरकारने लादली असल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, पूरग्रस्तांना मदत आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.