मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची २४ लाखांची पाणीपट्टीची थकबाकी,मुख्यमंत्र्यांचा बंगला डिफॉल्टर यादीत

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामान्य मुंबईकराने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका तुमची जलजोडणी खंडित करते.परंतु हीच गोष्ट शासकीय मंत्र्यांसाठी लागू होताना दिसत नाहीत. महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहेरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी आहे.यामध्ये शासकीय सह्याद्री अतिथीगृहाचा देखील समावेश आहे. तसेच सदर बंगल्याला पालिकेने चक्क डिफॉल्टर यादीत टाकले आहे. विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याचा देखील समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळवर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती.या माहितीनुसार, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा,वित्तमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, यासंह अन्य मंत्र्यांच्या बंगल्याचाही समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते “जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल, तर सामन्य जनतेने का भरावे? तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का ?”, असा सवाल देखील शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.

पाण्याची थकबाकी असलेले मंत्र्यांचे बंगले पुढीलप्रमाणे :

जयंत पाटील – जलसंपदा मंत्री (सेवासदन)
नितीन राउत – उर्जा मंत्री (पर्णकुटी)
बाळासाहेब थोरात – महसूलमंत्री (रॉयलस्टोन)
देवेंद्र फडणवीस – विरोधीपक्ष नेते (सागर)
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (मेघदूत)
सुभाष देसाई – उद्योगमंत्री (पुरातन)
दिलीप वळसे पाटील (शिवगिरी)
एकनाथ शिंदे – सार्वजनिक बांधकाम मंत्री (नंदनवन)
राजेश टोपे – आरोग्य मंत्री (जेतवन)
नाना पटोले – विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट)
राजेंद्र शिंगणे (सातपुडा)
नवाब मलिक – अल्पसंख्याक मंत्री (मुक्तागीरी)
छगनराव भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री (रामटेक)
रामराजे नाईक निंबाळकर – विधानभवन सभापती (अजंठा)

Previous articleविधानभवनात केलेल्या चाचणीत आढळले १७ जण कोरोना पॉझिटिव्ह
Next articleआमदार गोपीचंद पडळकरांची ढोल वाजवत विधानभवनात एन्ट्री