मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या डागडुजीसाठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांच्या बंगल्यांचा समावेश आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर ३ कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी ट्वीट करत यासांदर्भात भाष्य केले आहे.
“काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही”, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर केल्या जाणाऱ्या या खर्चाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील विचारण्यात आले असता त्यांनीही हे वृत्त फेटाळले. मंत्र्यांच्या बंगल्यावर ९० कोटी खर्च झालेले नाहीत. मी माहिती घेतली, काहीही बातम्या दिल्या जात आहेत. अद्याप आकडे पुढे आलेले नसताना ९० कोटी हा आकडा कुठून आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यावरील या खर्चावरून विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. मंत्र्यांच्या बंगल्यावर ९० कोटी खर्च करण्यात आले. पण विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असे सांगता मग ९० कोटी आले कुठून असा सवाल, राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच ठाकरे सरकार हे कंत्राटदार धार्जिणे असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. जलसंपदा विभाग,नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बंगल्यावर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र आरोग्य विभागावर जी तरतूद आहे, त्यात ५० टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा याचे भान असायला हवे,असा टोलाही त्यांनी लगावला.