आम्ही बैठक घेतली तर त्रास,कोरोनाने तुमच्या कानात येऊन सांगितले का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाने तुमच्या कानात येऊन सांगितले का ? की लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास होत नाही. पण,आम्ही बैठक घेतली तर कोरोनाचा त्रास होतो,अशी जळजळीत टीका भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनावेळी ते सभागृत बोलत होते. यावेळचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

यामध्ये ते बोलतात की,”नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवे. मला तुमची भूमिका माहित आहे, लोकशाहीवादी भूमिका तुम्ही अध्यक्ष म्हणून घेतली. याही समित्यांमध्ये राजकारण सुरु आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. विधानपरिषदेची नावे येत नाहीत म्हणून समित्यांचे काम होऊ द्यायचे नाही. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे काम सुरू आहे. लोकल सुरू करता येते, तिथे कोरोनाचा त्रास नाही. पण, उद्या आम्ही बैठक घेतली तर कोरोना व्हायरसने तुम्ही बैठक घेतली तर याद राखा, असे सांगितले आहे”, असा सणसणीत टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

बैठका सुरू झाल्या पाहिजे, अशी मागणी अध्यक्षांकडे करत तुम्ही नोटिफिकेशन द्यायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली. सर्व समित्या कोमामध्ये आहेत,असेही ते म्हणाले. दरम्यान, आज कामकाजाला सुरुवात होण्याआधीच सुधीर मुनगंटीवार यांनी कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचे नियमांचे पुस्तक दिले असून त्यात ३२० नियम आहेत. त्यात अतिशय उत्तम व्यवस्था केल्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात शिरू शकणार नाही. मात्र कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता असल्याने त्यांनी वारंवार नमूद केले.

Previous articleबंगल्यावर तीन कोटी खर्चाच्या वृत्तावर धनंजय मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट
Next articleराखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या उमेदवारांना दिलासा