अजित पवार म्हणाले….ज्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल !

मुंबई नगरी टीम

मुंबई । २१ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जात असतानाच आज विधानसभेत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली.भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत;मात्र राज्यातील अधिकारी १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी होणार असल्याचे सांगत आहे.असे निदर्शनास आणून देत,विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर विचार करावा,अशी मागणी त्यांनी केली.याला उत्तर देतांना अजित पवार म्हणाले की, विधीमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.ज्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल त्यांनी तेथे जाऊन महाराजांना अभिवादन करावे,असे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये.याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० निश्‍चित करण्यात आला आहे.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तिथीनुसारच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत होते.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. त्यांच्यासह शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील आमदार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला ३६५ दिवस महान आहेत. त्यामुळे केवळ १ दिवस महाराजांची जयंती साजरी करून त्यांचा गौरव रहाणार नाही.

Previous articleमहाविकास आघाडीचे सरकार आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणार
Next articleअजित पवारांची मोठी घोषणा : धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार