भाजपचा राजीनामा द्या,आम्ही तीनही पक्ष मिळून निवडून आणू

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेल्यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साद घातली आहे.जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत प्रवेश करतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून महाविकास आघाडीत येणा-यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

जनसुराज्य पक्षाचे नेते,माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यावेळी पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांना त्यांनी साद घातली.पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना निर्माण व्हायला लागली आहे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे सांगताच,जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत प्रवेश करतील त्यांवेळी पोटनिवडणूकीत त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार देईल.पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी अजित पवार यांनी यावेळी दिली.

राज्यात भाजपची सत्ता असताना विरोधकांकडून अनेक प्रलोभने,आमिषे दाखवून आमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश देण्यात आला.काहींना भीती दाखवून फोडण्याचा प्रयत्न झाला. राज्यात आघाडीचे सरकार येणार नाही,असे समजून अनेक नेते भाजपात गेले. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो ? असे वाटायला लागलेय अशी सद्यस्थिती असलेयाचे अजित पवार यांनी सांगून,येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला.कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम करुन दाखवले.राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असताना देखील आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शरद पवार,काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद सोबत असेपर्यंत या महाविकास आघाडी सरकारला कोणताही धक्का लागणार नाही असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार हे आज काम करत आहेत.या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही असेही अजित पवार यांनी सांगितले.राजकीय जीवनात पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे.आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे असे आवाहनही त्यांनी केले.सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.देशासमोर शेतक-यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. केंद्राकडून प्रश्न सोडवले जात नाहीय. मात्र आम्ही सर्व घटकांना न्याय देणारे आहोत. इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे हेही त्यांनी स्पष्ट केले.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत बोलताना पवार म्हणाले की,उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचे हे ठरवतील.काम सुरू करण्यासाठी जे करायचे आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल असेही पवार म्हणाले.केंद्र आणि राज्यसरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी ५०-५५ वर्षाची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी ३० वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतोय मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही.उलट मदतच करत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleसंजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला महत्वाचा निर्णय
Next articleकोरोना संकटात १ लाख ३२ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार; नोंदणीची मुदत वाढवली