मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील जागेवर मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे.या मुद्द्यावरून आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत.या प्रकरणात शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरील राजकारण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा बनला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत ही चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. यावर अधिक बोलताना ते म्हणाले,कारशेडबाबत कुठेतरी एकमत व्हायला हवे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे.हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार आहेत. गरज पडली तर ते एक-दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटण्याची शक्यता आहे, असे नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांच्या मध्यस्थीवर भाजपने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी मेट्रो २०२१ साली सुरू होणार असेल,ती २०२४ मध्ये का सुरू करायची. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी बोलावे.आम्हाला यात काहीही अडचण नाही. तोडगा कोणीही काढला तरी आनंदच असेल,असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच राज्य सरकराने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल शरद पवार वाचतील तेव्हा तेही योग्य निर्णय घेतील,आम्हाला विरोध करणार नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रो-३ कारशेडचा मुद्दा हा पहिल्यापासूनच वादात सापडला आहे.याधीही आरे येथे उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडवरून मोठा वादंग उठला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने आरे ऐवजी कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निवडली. त्यातही केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेतली. तर आता मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे नेमका का तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.