भाजप आमदाराच्या लग्नात कोरोनाच्या नियमांना हरताळ ; लग्नाला तोबा गर्दी

मुंबई नगरी टीम

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या समारंभ, विवाह सोहळे हे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.सामान्य नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत आहे. परंतु हाच नियम नेते मंडळींना लागू होत नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.त्याचे कारण म्हणजे माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. मात्र त्यांच्या लग्न सोहळ्यात इतकी गर्दी जमली की, कोरोना काय आणि त्याचे नियम काय याचा उपस्थितांना विसरच पडल्याचे दिसले.

काल पुण्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर,खासदार गिरीश बापट,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार नितेश राणे,आमदार गोपीचंद पडळकर या नेत्यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती.त्यामुळे नियमांमध्ये नेते मंडळींना विशेष सूट आहे का ? असे सवाल समाज माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहेगेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाची टांगती तलवार सर्वांवर आहे. यावर अद्याप लसही नसल्याने अधिक खबरदारी घेतली जात आहे.पुनश्च हरी ओम म्हणत राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदी उठवली. त्यात लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना देखील परवानगी दिली. मात्र त्यासाठी ५० लोकांची मर्यादा घालण्यात आली, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. सामान्य नागरिकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत आहेत. मात्र हीच बाब नेते मंडळींना लागू होत नसल्याचे चित्र आहे.भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नातील काही फोटो शुभेच्छांसह काही नेत्यांनी समाज माध्यमात पोस्ट केले आहेत. त्यातून या गर्दीचा काहीसा अंदाज येऊ शकतो.

आमदार राम सातपुते यांच्या लग्नातील गर्दी पाहता कोरोना गेला की काय ? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी समाज माध्यमातून विचारला आहे.सोहळ्यात उपस्थितांच्या तोंडावर मास्क दिसत नाही.त्यात सोशल डिस्टन्सिंगचा तर पार फज्जा उडालेला दिसत आहे.त्यात लोकप्रतिनिधींची उपस्थिती असल्याने त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमच धाब्यावर बसवल्याचे चित्र पाहायला मिळाले.एरवी कोरोना उपाय योजनांवरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरतात. मात्र इथे त्यांनीच नियमांचा बोजवारा उडवला आहे.देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांवर सध्या समाज माध्यमातून टीका केली जात आहे.

Previous article‘टीम इंडिया’ म्हणून काम करा आताही वेळ गेलेली नाही : चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Next articleतिन्ही पक्षांचे आमदार महाविकास आघाडीवर नाराज ; फडणवीसांचा गौप्यस्फोट