मुंबई नगरी टीम
सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन देणाऱ्यांचे दोन गट पाहायला मिळत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.शरद पवारांचे मनावर घेऊ नका,ते नेहमी उलटे बोलतात.इतके खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर विश्वासघातकी राजे होतात,अशी जळजळीत टीका खोत यांनी केली आहे. सांगलीत काढलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ करताना त्यांनी पवारांवर निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यासंदर्भात भाष्य करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.”पवार साहेबांचे मनावर घेऊ नका.ते नेहमी उलटे बोलतात.जेव्हा ते बोलतात की सूर्य पूर्वेला उगवेल.तर समजायचे की उद्यापासुन सूर्य पश्चिमेला उगवणार, मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात.तसे शरद पवारांनी आत्मचारित्रात लिहून ठेवले आहे. मात्र हेच शरद पवार आपला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हणतात. त्यामुळे मला प्रश्न पडतोय आत्मचरित्र वाचावे की नाही. शेतकऱ्यांच्या जाणत्या राजाला सांगेन की, खोटे बोलू नका.नाहीतर या महाराष्ट्रात तुमचा इतिहास लिहला जाईल की, तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर विश्वासघाती आणि खोटारडे राजे होतात”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरही टीका केली. राजकीय स्वार्थासाठी काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून हे दलालांचे आंदोलन असल्याचे ते म्हणाले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची देखील घोषणा केली. २४ डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होत आहे. तर २७ डिसेंबरला यात्रेची सांगता होईल. चार टप्प्यात ही यात्रा पार पडणार आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते ही यात्रा सुरू करण्यात आली असून त्याची सांगता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या या यात्रेवर टीका होत असल्याचे दिसत आहे.