मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी एका खंबीर राजकीय नेतृत्वाची गरज आहे. या नेतृत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तमरित्या पार पाडतील. त्यामुळे येत्या काळात शरद पवार यांच्याकडे ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ युपीएचे अध्यक्षपद येण्याची चिन्हे आहेत, अशी चर्चा गेल्या जाही दिवसांत रंगली होती. परंतु आपल्याला युपीएच्या अध्यक्षपदाबाबत फारसा रस नाही. त्याबाबत सध्यातरी कुठलीच चर्चा नाही, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले होते. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागलेला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी युपीएच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
युपीएच्या अध्यक्षपदासासाठी शरद पवार यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. तसेच देशात विरोधी पक्ष खिळखिळा झाला असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व द्यावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर आता पी. चिदंबरम यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. युपीएमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही. अनेक पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आघाडीचा विस्तार आणि त्यांच्यात बैठका घडवून आणण्यासाठी एका नेत्याची आवश्यकता असते. आघाडीमध्ये जो पक्ष सर्वात मोठा आहे, त्याच पक्षाचा अध्यक्ष युपीएचे नेतृत्व करतो, असे चिदंबरम म्हणाले. युपीएचे अध्यक्षपद म्हणजे काही पंतप्रधानपदाची निवड नाही. तर शरद पवार यांना देखील युपीएचे अध्यक्ष होण्याची इच्छा नसावी, असे ते म्हणाले.
युपीएमधील पक्षांच्या बैठकांविषयी बोलताना ते म्हणाले, आघाडीतील कोणत्याही पक्षाने बैठक बोलवली, तर तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो. कोणताही पक्ष आघाडीची बैठक बोलवणार असेल तर काँग्रेस त्या बैठकीत सहभागी होईल. मात्र काँग्रेसने जर बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता त्या बैठकीचा अध्यक्ष असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, युपीएमध्ये ९ ते १० पक्ष असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. यामध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेत एकूण ९० ते १०० सदस्य आहेत, असे ते म्हणाले.