महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली गुंफा बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. सुमारे २ हजार वर्षांपुर्वीच्या या गुंफा व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणा-या ठाकरे सरकारच्या या बेकायदेशीर कृतीचा निषेध आज भाजपाच्यावतीने करण्यात आला.विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली गुंफा येथे सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला.

यावेळी हा प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपाचे नेते किरिट सोमैय्या यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिल्डरच्या चरणी लोटांगण घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करित असून मुंबईची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकू देणार नाही व असा कोणीही प्रयत्न केला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा जोरदार इशारा प्रविण दरेकर यांनी आज दिला.मुंबई महापालिका व ठाकरे सरकारने खाजगी बिल्डर शाहिद बालवा,अविनाश भोसले व विनोद गोएंका यांना अंधेरी येथील सुमारे २००० वर्ष जुन्या महाकाली गुंफा व मंदिरचा जागेचा टी डी आर देण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर व सोमैय्या यांनी आज त्या जागेची पाहणी केली. तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली. मुंबई महापालिका व सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा यावेळी भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. ठाकरे सरकारचा निषेध असो..आघाडी सरकार हाय हाय..अशा जोरदार घोषणाबाजी भाजपाच्यावतीने करण्यात आली.

यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगतिले की, ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाली आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या ठाकरे सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतु सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम या सरकारचा सुरु असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.सरकार सत्तेत आल्यापासून मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजप नेहमी जनतेच्या पाठीशी आहे, म्हणूनच जेव्हा येथील नागरिकांवर अन्याय होत आहे, तेव्हा आम्ही आज येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

Previous articleकोरोना लस मोफत देण्याच्या घुमजावानंतर ‘या’ माजी मंत्र्याने केले केंद्राचे अभिनंदन
Next articleघरच्या ‘मुख्यमंत्र्यांसाठी’ गृहमंत्र्यांनी येरवडा तुरुंगातून खरेदी केली पैठणी