मुंबई नगरी टीम
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. त्यानुसार त्यांना ११ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. याआधी ४ जानेवारीला वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची चौकशी केली जाणार आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे सर्वातआधी २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. मात्र ईडीकडून अधिकची वेळ मागून त्यांनी चौकशी टाळली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांना ५ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पंरतु एक दिवस आधीच ४ जानेवारीला त्या ईडीच्या चौकशीसाठी हजर झाल्या. आता पुन्हा त्यांना ११ तारखेला ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, या घोटाळ्यात शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा सहभाग असल्याचा दावा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण ?
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहेत. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नी माधुरी राऊत तसेच वर्षा राऊत यांच्यात झालेल्या ५५ लाखांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ईडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. एचडीआयएलचे संचालक असताना प्रवीण राऊत यांनी या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले होते. २०१० साली माधुरी यांनी याच रकमेतून वर्षा राऊत यांच्या खात्यात ५५ लाख रुपये जमा केले होते. हे बिनव्याजी कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. या पैशातून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. तसेच माधुरी आणि वर्षा राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदारी आहेत. वर्षा राऊत यांचे अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये अवघ्या ५,६२५ रुपयांचे भाडंवल होते. तरीही त्यांना १२ लाखांचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जाची परतफेड अद्याप झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता ईडीच्या रडारवर आहे.