पदवीधर-शिक्षक निवडणुकीत घोळ,मराठवाड्यात ५ हजार मतपत्रिका कोऱ्या !

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी काळात येऊ घातलेल्या राज्यातील १४ हजार ५०० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपने आपली कंबर कसली आहे. तर ग्रामपंचायतसह आगामी पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी देखील भाजपने आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपच्या प्रदेशस्तरीय बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मात्र आगामी निवडणुकांविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. पदवीधर-शिक्षक निवडणुकीत घोळ झाला असून मराठवाड्यात तब्बल ५ हजार मतपत्रिका कोऱ्या होत्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला पाचही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची समीक्षा भाजपच्या चिंतन बैठकीत झाल्याचे सांगतानाच यात घोळ असल्याचा दावा, चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेचा जो पराभव आहे, त्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रशासनाकडून घपला झाला असून येत्या १५ दिवसांत आपण पुराव्यानिशी ते मांडणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पदवीधर-शिक्षक निवडणुकांमध्ये काही पक्षांना ईव्हीएम का नको आणि बॅलेट पेपर का हवे आहे, निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. जिथे एका मताला तीन मिनिटे लागतात. तिथे पुण्यात एका बुथवर शेवटच्या तासांत ६० मिनिटांमध्ये १३८ मतदान कसे होऊ शकते. मग ६० मिनिटामध्ये २०च मतदान झाले पाहिजे. एखादा दुसरा नव्हे तर ९०० पैकी ३०० बुथवर असे कसे झाले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पदवीधर नसलेल्या लोकांचे देखील मतदान झाले आहे. काही कुटुंबातील नावे गायब झाली आहेत. मराठवाड्यामध्ये पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्यात. पुणे पदवीधर मधील काही हजार नावांची ओळख पटलेली आहे, जे पदवीधरच नाहीत. यावर सध्या एक एजन्सी काम करत असून या सगळ्याची यादी आम्ही पत्रकारांना देणार आहोत. यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टी आपण मांडणार आहोत. १८ जानेवारीपूर्वी निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न

बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने योजना झाली.२८ कार्यकर्ते आगामी तीन दिवसांमध्ये मिळून सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहेत. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे. किती ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यातील किती गावे ही भाजपचा सरपंच करण्याच्या दिशेने जातील, अशी सर्व योजना आखतील. १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ कार्यकर्त्यांवर जबाबदारी

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा
पंकजाताई मुंडे- बीड
चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा
गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर
आशिष शेलार – ठाणे
रविंद्र चव्हाण – सिंधुदुर्ग
रावसाहेब दानवे पाटील – नांदेड
संजय कुटे- अकोला आणि अमरावती
सुरेश हाळवणकर – सांगली आणि पुणे
सुभाष देशमुख – कोल्हापूर
प्रसाद लाड – रत्नागिरी उत्तर-दक्षिण
प्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण
विनोद तावडे – पालघर
गिरीष बापट – सातारा
संजयबाळा भेगडे- सोलापूर
संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद
प्रितमताई मुंडे – परभणी
बबनराव लोणीकर – हिंगोली
डॉ.भागवत कराड – जालना
जयकुमार रावल- धुळे
प्रा.देवयानी फरांदे-नंदुरबार
प्रा.राम शिंदे – नाशिक
चैनसुख संचेती – यवतमाळ
रणजीत पाटील – वाशिम
डॉ.अनिल बोंडे – बुलढाणा
अनिल सोले- गोंदिया
हरिभाऊ बागडे -औरंगाबाद
डॉ.रामदास आंबटकर – गडचिरोली

Previous articleवर्षा राऊत यांना ईडीचे पुन्हा समन्स, ‘या’ दिवशी होणार चौकशी
Next articleपोलीस भरती रद्द ; नव्या भरतीत मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळणार