मुंबई नगरी टीम
पुणे : “मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो.वाहनांचे जळीतकांड, वाहनांची तोडफोड,व्यापाऱ्यांना गुंडांकडून होणारा त्रास,यासह विविध गुन्हे कायमचे बंद करा.कोणाची हयगय करू नका.एकालाही पाठीशी घालू नका.माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला,तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो”, असे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सांगितले.शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ-३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. यावेळी अजित पवार यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना पोलिसांना तशा सुविधा देणे ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लवकरच आपण महाराष्ट्रातील बेस्ट आयुक्तालय करू मात्र, त्या इमारतीतून तसेच बेस्ट काम व्हायला हवे, अशी आशाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, ‘गोकी’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल उपस्थित होते. यासंदर्भात अधिक बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गेल्या सरकारच्या काळात सुरु झाले. पण खूप अपुरी सुविधा असताना इथे पोलीस कार्य करत आहेत. तुम्हाला सर्व काही द्यायचे आहे, पण कोरोनामुळे खर्च झाला आहे. लवकरच सुविधा पुरवू असे आश्वासन त्यांनी दिले.
कोरोना काळातील पोलिसांच्या कामाची नोंद इतिहासात होईल
राज्याच्या पोलिस दलाला शौर्याची, त्यागाची मोठी परंपरा आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले, त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेऊन प्रत्येक पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे, असे सांगतानाचा कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चित घेतली जाईल, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्टस् सायकल देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. या उपक्रमामुळे पोलीस दलाचे आरोग्य निश्चितच सुधारेल, त्यांची क्षमता वाढेल. त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा अधिक ‘स्मार्ट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनवण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाच्यावतीने या विभागातील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पोलीसांना दर्जेदार निवास व्यवस्था, आवश्यक वाहने व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. पोलीसांसाठी घरांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा, मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. याबरोबरच पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनसाठी देखील आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी पोलिसांना दिले.

















