मुंबई नगरी टीम
मुंबई : कुणी कुणावर काहीही आरोप केले म्हणजे ताबडतोब कारवाई होत नाही. त्या आरोपाची शहानिशा केली जाते. उद्या आम्ही जर कुणावर बलात्काराचे आरोप केले तर, त्याला काय लगेच फाशीवर देणार का?, असा सवाल शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी बोलताना अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिली. या सगळ्याला कायद्याचे स्वरूप आहे, त्यानुसार ते हाताळले जाईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना अनिल परब यांनी याबाबत भाष्य केले. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, “तक्रार करणे हे त्यांचे कामच आहे. किरीट सोमय्या यांचा तो धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून आम्ही ताबडतोब येथे कारवाई करायची हा एकप्रकारे कुणावरही अन्याय होऊ शकतो. त्यामुळे तक्रारीची व्यवस्थित छाननी होईल त्यातही सत्य काय हे तपासले जाईल. त्यानंतरच निर्णय होईल”, असे अनिल परब म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत त्यामुळे तातडीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी होत आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले, कुणी कुणावर काहीही आरोप केले म्हणजे ताबडतोब कारवाई होत नाही. त्या आरोपाची शहानिशा केली जाते. उद्या आम्ही जर कुणावर बलात्काराचे आरोप केले तर, त्याला काय लगेच फाशीवर देणार का ?. कायदा आहे, कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालतात, असे अनिल परब यांनी म्हटले. दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडी कायदेशीर शहानिशा झाल्यानंतरच या प्रकरणी निर्णय घेणार अशी भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे विरोधक मात्र तातडीच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत.
..तर मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही – प्रकाश आंबेडकर
भाजप नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असे म्हणत त्यांनी मुंडेंनाही टोला लगावला.
मुंडेंवर माझा विश्वास ते राजीनामा देतील – चंद्रकांत पाटील
धनंजय मुंडे यांच्यावर माझा विश्वास आहे. ते आता स्वतःहूनच राजीनामा देतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते त्यासंदर्भात शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पवारांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका मांडली आहे.