मुंबई नगरी टीम
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी. त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यानंतर पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेऊ,अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. त्यामुळे तूर्तास तरी राष्ट्रवादीकडून मुंडेंवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र पवारांच्या याच भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचे ते म्हणाले.
रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शरद पवार यांनी आरोपांची दखल घेत ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे म्हटले होते. मात्र तक्रारदार महिलेच्या विरोधातच अन्य लोकांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार केली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. सुरुवातीला चित्र वेगळे होते आता काही वेगळे आहे. त्यामुळे या सर्वप्रकणी सखोल चौकशी व्हावी, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांनी बदललेल्या भूमिकेवरून टीका केली आहे. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले. “शरद पवार म्हणाले आरोप गंभीर आहेत आणि त्याची दखल घेतली जाईल. अशा प्रकरणी कडक धोरण स्वीकारण्याची पार्श्वभूमी शरद पवार यांची आहे. पण काल पवारांची पत्रकार परिषद ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला. अपेक्षा भंग झाला. कारण त्यांनी असे म्हटले की, पोलीस चौकशी करतील. त्यातून काय निष्पन्न होईल त्यानंतर बघू, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “मात्र मी पुन्हा सांगतो की हे दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत. रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वेगळी करा. मुंबई पोलिसांकडून करा, महाराष्ट्र सीआयडीकडून करा किंवा तुम्हाला चालणार असेल तर सीबीआयकडून करा. रेणू शर्माची बहीण जी आहे. तिच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी मान्य केले आहे की, १५ वर्ष आम्ही संबंधात होतो. माझ्यापासून त्यांना दोन मुले आहेत. माझे नाव त्यांना मी दिले आहे. या विषयावरून मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे की नाही?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या राजकारणातील काही उदाहरणे देखील दिली.शरद पवार हे म्हणाले होते आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातील विषयांवर पवार हे नेहमीच कडक धोरण स्वीकारतात. पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाले त्यांना पवार यांनी कधीच पाठीशी घातले असे झाले नाही. पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. धनंजय मुंडे यांनी संवेदनशीलपणा दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अन्यथा शरद पवार यांनी नैतिकतेच्या जबाबदारीने मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी सुरु राहील,पण रेणू शर्मा यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे राजीनामा देण्याची मागणी केली होती.यापूर्वीही १९८४ मध्ये रामराव आदिक यांच्याविरोधात हवाई सुंदरीनी केलेल्या तक्रारीनंतर त्यांचा राजीनामा घेण्याच आला, २००९ मध्ये एन.डी तिवारी यांनाही आक्षेपार्ह चित्रफीतीमुळे राज्यपाल पदाचा राजीनामा द्यायला लागला होता असे सांगतानाच, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर भाजपा महिला मोर्चा सोमवारपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार आहे. विविध प्रकरणांमुळे कशाप्रकारे नेत्यांना राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी सांगितले. ही जी नैतिकतेची चाड आहे ती शरद पवारांकडून तरी अपेक्षित आहे. भारतीय राजकारणात त्या त्या वेळेला अशा घटना घडल्यावर राजीनामा देण्याचीच कृती घडली आहे. इतकी मोठी चूक झाल्यानंतर राजकीय स्थानावर बसता येत नाही हे लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याने सोमवारपासून आंदोलन करणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप महिला मोर्च्याच्या वतीने सर्व तहसीलदार कचेरीसमोर, सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला मोर्च्याच्या कार्यकर्त्या निदर्शने करतील. संबंधित तहसीलदार आणि कलेक्टरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवेदन देतील. जितेंद्र आव्हाडांपासून ते अनेकांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला राज्य चालवायचे आहे का?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.