धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची एका आठवड्यात होणार चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे ते अडचणीत सापडले असतानाच सध्या त्यांचा राजीनामा घेणार नसले तरी या प्रकरणाची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तक्रारदार महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या वकिलाला जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा या महिलेकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे.मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपकडून येत्या सोमवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.या महिलेने मुंडेंवर केलेल्या आरोपामुळे पहिल्या दोन दिवसात त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता.मात्र भाजपचे नेते भाजपा नेते कृष्णा हेगडे, आणि मनसेचे मनिष धुरी यांनी तक्रारदार महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगचे आरोप केल्याने धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळंच वळण लागले आहे. भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी या महिलेवर केलेल्या आरोपमुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राजीनाम्यापासून दिलासा मिळाला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली असून, संबंधित महिलेवर ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत,वेगळ्या विचारांचे,वेगळ्या भूमिकेचे लोक एकाच महिलेबद्दल बोलत आहेत.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले होते असे शरद पवार यांनी सांगितल्याने मुंडे यांना तुर्तास अभय मिळाले आहे.संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही पवार म्हणाले होते. काल शुक्रवारी या प्रकरणी गृहमंत्री देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील,अतिरिक्त आयुक्त संदीर कर्णिक,ज्योत्सना रासम यांची बैठक घेतली,सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात.तर या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी अशी सूचना गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे यासंदर्भातील वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

Previous articleबापरे ! २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांनी लढवली ग्रामपंचायतीची निवडणूक
Next articleधनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली नाराजी