मुंबई नगरी टीम
मुंबई : अजित पवार साहेब तुमची भाषा नीट करा. नाहीतर तुमची घमेंड उतरावल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशारा भाजप नेते निलेश राणे यांनी दिला आहे. सध्या अनेक प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले असून या मुद्द्यावरून आता भाजप नेते सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. यासंबंधित निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशास तसे उत्तर दिले होते. त्यावरून आता निलेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवारांना इशारा दिला आहे.
“फार कमी नेते आहेत महाराष्ट्रमध्ये ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावे लागेल. अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही”, असे ट्वीट त्यांनी केले आहे. सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. यावरून निलेश राणेंनी ट्वीट करत निशाणा साधला होता. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायचे का? एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. त्यावर आज निलेश राणेंनी थेट अजित पवारांना आक्रमक इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते निलेश राणे ?
“काय चाललंय महाराष्ट्रात ??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी ?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. मुंडे प्रकरणावरून ही भेट घेतली असल्याचे बोलले जात होते. त्यावरून निलेश राणेंनी संताप व्यक्त करत हे ट्वीट केले होते. यासह त्यांनी आणखी एक ट्वीट करत नवाब मलिक यांच्या जावयावर झालेल्या कारवाईवरूनही राष्ट्रवादीवर टीका केली होती. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला.राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत”.