बारावीची २३ एप्रिलला तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल पासून;निकाल ‘या’ तारखेला जाहीर करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी ची लेखी परीक्षा २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा २९ एप्रिल पासून सुरु होणार आहे. याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला होत्या.त्यानंतर राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षांच्या तारखांकडे लक्ष लागले असतानाच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या तारखा घोषित केल्या आहेत इयत्ता १२ वी ची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे.या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा २९ एप्रील २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येतील.या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.राज्यात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून १८ जानेवारी २०२१ रोजी २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व २१ हजार २८७ शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे ७६.८ टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली.

Previous articleआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleमंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारणा-या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावले