मुंबई नगरी टीम
मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच खडसावले आहे.मंत्रीमंडळ बैठकीला मंत्रीच नसतील तर काय उपयोग? कितीही अडचण असली तरी बैठकीला उपस्थित राहायचे. यापुढे असे होता कामा नये, अशी तंबी अजित पवार यांनी मंत्र्यांना दिली आहे. दरम्यान, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे अजित पवार यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत कोणत्याही मंत्र्याने दांडी मारू नये, असे फर्मानच काढले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या कामकाजाची पद्धत आणि कडक शिस्तीमुळे चर्चेत असतात.मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या उपस्थितीबाबतही त्यांनी अशाच शिस्तीची अपेक्षा केली आहे. मंत्रीमंडळ बैठकीला कोणत्याही मंत्र्यांची दांडी नको, असे आदेश अजित पवार यांनी मंत्र्यांना दिले आहेत. तसेच कितीही अडचण असेल तरी बैठकीला उपस्थित राहायचेच, असे अजित पवारांनी दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना बजावले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या या कडक शिस्तीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
यावेळी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रत्यक्ष हजेरी लावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच बैठकीला हजेरी लावली होती.मात्र मुख्यमंत्री उपस्थित असताना अनेक मंत्र्यांची बैठकीला गैरहजेरी दिसली. अनेक मंत्री रेंज नाही, प्रवसात आहोत, अशी कारण देत बैठकांना दांडी मारत असल्याचे देखील अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले याची माहिती मंत्र्यांना असणे आवश्यक आहे. जेणे करुन ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगू शकतात. त्यामुळे यापुढे बैठकीला अनुपस्थित न राहण्याचे सक्त आदेश अजित पवारांनी दिले आहेत.