मुंबई नगरी टीम
सातारा : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती,असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.इतकेच नव्हे तर पोटनिवडणुकीत निवडून आणण्यासाठी १०० कोटी लागले तरी खर्च करू,तुम्हाला मंत्रिपद देऊ,अशा ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलेली असताना भाजपने मात्र याचे खंडन केले आहे.शशिकांत शिंदे यांचे वक्तव्य हे निराधार असल्याचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या या ऑफरचा खुलासा केला.सर्वत्र हे वृत्त झळकल्यानंतर आता भाजप नेत्यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत मात्र शशिकांत शिंदे यांचे हे वक्तव्य निराधार असल्याचे म्हणत त्यांच्या या दाव्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खंडन केले आहे. पक्षात येण्यासंदर्भात बोलणे होऊ शकते. पंरतु अशी कुठलीही १०० कोटींची ऑफर चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत देण्यात आलेली नाही,असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा दावा नेमका खरा की खोटा,असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नेमके काय म्हणाले शशिकांत शिंदे?
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती.अनेक माध्यमातून माझ्याशी ते संपर्कात होते.मंत्रिपद आम्ही तुम्हाला देऊ.जर पोटनिवडणूक पुन्हा लागली तरी तुमच्यासाठी पाहिजे तेवढे पैसे खर्च करण्याची आमची तयारी आहे.मग १०० कोटी लागले तरी आम्ही तुमच्या निवडणुकीसाठी खर्च करू,असे निरोप आणि ऑफर मला आल्या होत्या मात्र तेव्हा आपण ती ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन,असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

















