..म्हणून मला सध्यातरी मुख्यमंत्री होण्याची घाई नाही : अशोक चव्हाण

मुंबई नगरी टीम

भोकर : राज्यात सध्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छांची बरीच चर्चा रंगताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली जात असतानाच मला मुख्यमंत्री होण्याची कसलीही घाई नाही, असे विधान काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे सध्यातरी मला मुख्यमंत्री होण्याची कसलीही घाई नाही,असे अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात मिश्किल टिप्पणी केली होती.

नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये एका कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण आले होते.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. “महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात आम्ही भाजपला रोखले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आपली सत्ता आली म्हणून सर्व कामे होत आहेत. त्यामुळे मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही आहे. उद्धव ठाकरे राज्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत मनापासून साथ देत आहोत. मला कुठेही या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करायची नाही आहे. काही लोक बिघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, चिंता करु नका, तसे काही होणार नाही. उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने आम्ही मदतीला आहोत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार आम्ही सर्व प्रामाणिकपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहू. महाविकास आघाडी सरकार भक्कामपणे पुढील पाच वर्ष महाराष्ट्राला साथ देईल”, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्याला देखील मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले होते. तर जयंत पाटील यांच्या या इच्छेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता. असे असतानाच मला मुख्यमंत्री व्हावेसे वाटले तर काय करू, असा उलट सवाल शरद पवार यांनी केला. मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.

Previous articleदेवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांकडून भाजप प्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर !
Next articleअर्णबला एअरस्ट्राईकची माहिती आधीच कशी ? केंद्राने उत्तर द्यावे; गृहमंत्र्यांची मागणी