अर्णब गोस्वामीवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसचे राज्यभरात धरणे आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती अर्नब गोस्वामीला मिळत होती व अर्नब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी या माहितीचा वापर करत होता हे अत्यंत गंभीर असून हा राष्ट्रद्रोहच आहे. या प्रकरणी अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले.संतप्त कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अर्नब गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे अर्नब गोस्वामी विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अर्नब गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचा निषेध केला.

लातूर येथे आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, परभणी येथे आ. सुरेश वरपूडकर, अमरावती येथे आ. सुलभा खोडके, नागपूर येथे आ. विकास ठाकरे, सोलापूर येथे आ, प्रणिती शिंदे, औरंगाबाद येथे जिल्हाध्यक्ष हिशाब उस्मानी,नाशिक येथे शरद आहेर यांच्या, कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, चंद्रपूर येथे प्रकाश देवतळे, रत्नागिरी येथे विजय भोसले, जळगाव येथे संदीप पाटील, नंदूरबार येथे जिल्हा कार्याध्यक्ष नाईक, धुळे येथे शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली व इतर जिल्ह्यातही काँग्रेस नेते व पदाधिका-यांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिका-यांना निवेदन देत गोस्वामीवर कारवाई करण्याची मागणी केली.

Previous articleप्रदेशाध्यक्ष पदावर येण्यापूर्वीच नाना पटोलेंची स्वबळाची भाषा
Next articleदेवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांकडून भाजप प्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर !