प्रदेशाध्यक्ष पदावर येण्यापूर्वीच नाना पटोलेंची स्वबळाची भाषा

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली जाणार आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडण्याआधीच नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली आहे. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याबाबत त्यांनी विधान केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची स्वबळाची भूमिका स्पष्ट असल्याचे संकेत पुन्हा एकदा मिळाले आहेत. यापूर्वी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी नव्या पदाची धुरा हाती घेताच स्वबळाचा नारा दिला होता. तर आता प्रदेशाध्यक्ष पदावर येण्याआधीच नाना पटोलेंनी स्वबळावर सत्ता आणण्याचे विधान केले आहे.

मुरबाडमध्ये एका कार्यक्रमात नाना पटोले यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन, असे सूचक विधान नाना पटोले यांनी केले आहे. तसेच राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याचे काम केले जाईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे नाना पटोले यांच्या या विधानामुळे त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्ष पद सोपवले जाणार, असे चित्र अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. तर दुसरे म्हणजे आगामी निवडणुकीत काँग्रेस ‘एकला चलो रे’ ही भूमिका स्वीकारेल असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

महाविकास आघाडीने एकत्र येत विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका लढवल्या आणि मोठा विजय त्यात मिळवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळलेले सर्वांनीच पाहिले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही एकत्र यावे अशी भूमिका महाविकास आघाडीतील काही नेत्यांची आहे. मात्र असे असतानाच भाई जगताप आणि आता नवे होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा सूर आळवला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमके काय चित्र असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, नाना पटोले हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात यांच्यावरील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही नाना पटोले यांना मिळणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडकडून पटोले यांच्या नावाला निश्चित करण्यात आले, अशी माहिती आहे. मात्र यावर अधिकृत घोषणा कधी होणार हे अद्याप समजलेले नाही.

Previous articleधनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली,त्याला जबाबदार कोण ?
Next articleअर्णब गोस्वामीवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसचे राज्यभरात धरणे आंदोलन