धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली,त्याला जबाबदार कोण ?

मुंबई नगरी टीम

पुणे : पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून बंड करण्याची तयारीत आहेत. नाराज नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा देखीलआहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असे चढ उतार होत असतात. वारे बदलते तसे काही जण बदलत असतात,असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली, त्याला जबाबदार कोण ? असा सवालही त्यांनी केला पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.

रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्यांना अजित पवारांनी यावेळी सुनावले. एखादा व्यक्ती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो. तेव्हा प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र असे कुणी आरोप केले तर एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होते. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात. महिला संघटना आंदोलन करतात. ज्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. पूर्ण माहिती न घेता त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केले त्याला जबाबदार कोण ? त्याला उत्तर कोण देणार ? असा सवाल अजित पवारांनी केला. बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी तो बदनाम होतो, त्याचे कुटुंब अस्वस्थ होते, याला कुणी वाली आहे का नाही? पक्ष पाठीशी घालत असल्याचे आरोप झाले, शरद पवार, जयंत पाटील आम्हाला प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे यात पक्षाची देखील बदनामी झाली, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील भाजपचे नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने हा दावा फेटाळला असला तरी महाविकास आघाडीत इनकमिंगची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात अजित पवार यांना विचारले असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. “वेगवेगळ्या प्रकारे असे चढउतार होत असतात.वारे बदलते तसे काही जण बदलत असतात. मागे आमच्याच पक्षातल्या काही जणांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. ते जे काही इकडे जातात तिकडे जातात त्यांना पक्षनिष्ठा, ध्येय धोरणे याच्याशी काही घेणेदेणे नसते”, असा टोला अजित पवारांनी लगावला. आपल्या प्रभागातील, आपल्या वार्डातील कामे व्हावीत, असे कदाचित त्यांचे ध्येय असेल. ही कामे कशी होणार? तर सत्ताधारी पक्षात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपली कामे होतील, असा उद्देश असावा, असे अजित पवार म्हणाले.

मागील काळात नरेंद्र मोदी यांचा झंझावात पाहायला मिळाला. एकट्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार या भारतात आले. त्याच नेत्याच्या नावाखाली अनेक राज्ये आणि महानगरपालिका त्यांच्या ताब्यात गेल्या. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ही परिस्थिती बदलली आहे. जर कुणी आपल्या प्रभागाचा आणि वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून गेलेले असतील. तर ते आता वेगळा विचार करतील. विकासाच्या दृष्टीने ते काही निर्णय घेत असतील तर त्यात त्यांचा काही स्वार्थ नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील काल भाजपचे अनेक बडे नेते लवकरच महाविकास आघाडीत प्रवेश करणार असे संकेत दिले होते.

Previous articleभाजपचा यू टर्न, मुंडेवरील आरोप मागे घेणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी
Next articleप्रदेशाध्यक्ष पदावर येण्यापूर्वीच नाना पटोलेंची स्वबळाची भाषा