भाजपचा यू टर्न, मुंडेवरील आरोप मागे घेणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. मुंडेच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजपच्या महिला मोर्चाने आंदोलन करत निषेध नोंदवला होता. मात्र आता भाजपने मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्यावरील तक्रार मागे घेतली असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हणत रेणू शर्मावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपची भूमिका दुतोंडी असल्याची टीका अनेकजण करत आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ पोस्ट करत रेणू शर्मावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. आज ज्या पद्धतीने रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली हे सुद्धा माझ्यासाठी तितकेच धक्कादायक आहे. पहिल्या दिवसापासूनच भाजपची याबाबतची भूमिका स्पष्ट होती. केवळ धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरताच हे प्रकरण मर्यादित नव्हते. तर एक चुकीचे उदाहरण आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. ही भूमिका आम्ही घेतली. म्हणूनच त्यांचा राजीनामा आम्ही मागितला. पंरतु रेणू शर्माने आपला आरोप मागे घेतला आहे. त्यामुळे रेणू शर्मावर आयपीसी १९२च्या अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“खोटे आरोप करणे, खोटे गुन्हे दाखल करणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे एखादा राजकीय कार्यकर्ता असुदे किंवा सामान्य व्यक्ती तो उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने महिला खोटे आरोप दाखल करत असतील, तर ज्या खऱ्या पीडिता आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा बदलला जातो. हे समाजाच्या हिताचे नाही. मुंबई पोलिसांना आमची कळकळीची विनंती आहे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई करावी”, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून तसेच कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्माने म्हटले आहे. रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मुंडे यांच्याबाबतचा आमचा निर्णय योग्य होता, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडली.

Previous articleराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या ते धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाले शरद पवार
Next articleधनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली,त्याला जबाबदार कोण ?