मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकल प्रवासासाठी सरकारने काही वेळा निर्धारित करून दिल्या आहेत. त्यानुसारच सर्वसामान्यांना लोकलने प्रवास दिला जाणार आहे. सर्वांसाठी लोकल सुरू झाली असली तरी वेळेच्या निर्बंधामुळे मुंबईकरांना पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकलच्या वेळेत सुधारणा करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यानुसार लोकलच्या वेळेत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजेश टोपे आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकांची सोय हीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवले जाईल, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले आहे. लोकांचे हित लक्षात घेऊन त्यादृष्टीने काम केले जाईल. त्यामुळे काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावर अधिक बोलताना ते म्हणाले लोकलच्या वेळा नक्कीच बदलू शकतात. त्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज असल्यास आमचा विभाग देखील कळवले. यासह राज्य सरकार देखील यासंदर्भात निर्णय घेईल, असे राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे लोकलच्या वेळेत बदल होण्याची चिन्हे आहेत.
सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा काय ?
राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यासाठी काही वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत. पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत, तसेच रात्री ९ नंतर शेवटच्या गाडीपर्यंत सर्वांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. दरम्यानच्या वेळेत सर्व सामान्यांना लोकल प्रवास करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वेळेच्या निर्बंधामुळे सामान्यांना रेल्वे प्रवासासाठी कसरत करावी लागत आहे.